अल्पवयीन विवाहिता प्रकरण : नवऱ्यासह प्रियकराला अटक, एकाचा शोध सुरु
गुहागर, ता. 26 : अल्पवयीन विवाहिता 5 महिन्यांची गर्भवती असल्यालेचे समोर आल्यावर गुहागर पोलीसठाण्यात शुन्य क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात दोन प्रियकारांबरोबरच अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करणाऱ्या नवऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तिघांपैकी दोघांना पोलीसांनी अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे.
गुहागर तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील तरुणाबरोबर 15 दिवसांपूर्वी झाला होता. विवाहानंतर 15 दिवसांनी सदर अल्पवयीन तरुणीच्या पोटात दुखू लागले. रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत सदर तरुणी ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे रत्नागिरी पोलीस ठाण्यात बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) अज्ञाताविरोधता गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करताना सदर मुलीसोबत २ मुलांचे प्रेमसंबध असल्याचे उघड झाले. या पैकी एका 22 वर्षीय तरुणाला पोलीसांनी आज अटक केली आहे. या तरुणाचे 2018 पासून या मुलीवर प्रेम होते. ही दोघं एकमेकांना भेटत होती. असे चौकशीत समोर आले. तसेच ही मुलगी अल्पवयीन असताना तिच्यासोबत लग्न करणाऱ्या मार्गताम्हाणे येथील तरुणावर देखील पोलीसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतरच्या दिवसांत पतीन अल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवल्याने या कायद्याखाली त्यालाही अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आणखी एका प्रियकराचे नाव समोर आले असून पोलीस दुसऱ्या प्रियकाराचा शोध घेत आहेत. सदर संपूर्ण घटनेचा तपास चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक सोनाली झेंडे करीत आहेत.
दरम्यान अल्पवयीन मुलीसोबत पारंपरिक पध्दतीने विधीवत विवाह झाला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विवाह ठरविणाऱ्यांपासून, विवाहाचे विधी करणाऱ्यापर्यंत सर्वांवर कारवाई होऊ शकते. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.